फलटण : एप्रिल महिना सुरू झाला आणि उन्हाच्या झळांनी शेतशिवारे तापू लागली. रानात असणारी गव्हाच्या पिकाची काढणी जवळजवळ पूर्ण होत आली आहे. गेल्या वर्षी मुबलक पाऊस झाला असला तरी यंदा मात्र मार्चच्या सुरुवातीलाच पाण्याने तळ गाठला आहे. परिसरातील काशीदवाडी, वडजल, निंभोरे, नांदल, सुरवडी या गावांमध्ये भूजल पातळी खालावत चालली असून विहिरीच्या पाणीपातळीत लक्षणीय घट दिसून येत आहे.
गेल्या वर्षी या दिवसांत पाणीपातळी चांगली टिकून होती. या वर्षी मात्र कूपनलिकांचे पाणी तासाभर पण टिकत नाही.
भरपूर पाऊस पडूनसुद्धा मार्चच्या सुरुवातीलाच विहिरी आणि बोअरवेल यांचे पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे ऊसलागणीला पाणी देताना शेतकऱ्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. जूनपर्यंत ऊस व कडवळ पिकांना जगवताना शेतकरी हैराण होत आहेत. उपलब्ध पाणी आणि पीक यांचा समतोल कसा साधायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांना सोडवावा लागत आहे.
परिसरातील तलाव कोरडे पडू लागल्याने गावकरी चिंतेत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे. गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. परिसरात गेल्या दहा दिवसांत अचानक पाणीपातळी घटल्याचे शेतकरी सांगतात. बोअरवेल एकदमच कोरड्या पडत आहेत.
निसर्गाने भरभरून दिले; परंतु नियोजन व उपाययोजना यांच्याअभावी दरवर्षी शेतकऱ्यांना या दिवसात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एका बाजूला वाढता कोरोना आणि दुसऱ्या बाजूला घटती पाणीपातळी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.
गेल्या पावसाळ्यात भरपूर पाऊस पडूनही या वर्षी पाणीपातळी खालावली आहे. यापाठीमागचे वैज्ञानिक कारण शोधले पाहिजे; तसेच पाणी साठवण क्षमता वाढविली पाहिजे.
- संदीप कांबळे, ग्रामस्थ, सुरवडी