पळशी : माण तालुक्यातील पळशी परिसरासह आजूबाजूच्या गावातील रुग्णांना तातडीने व सोयीस्कर उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाच्यावतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असून, या रुग्णवाहिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारती पोळ, बाबासाहेब पवार, माणचे तालुका वैद्यकीय अधिकारी एल. डी. कोडलकर, पळशी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत घुटुकडे, डॉ. शुभांगी कुंभार, सरपंच शंकर देवकुळे, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९ गावांचा समावेश होत असून, आधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने पळशी, गोंदवले, लोधवडे, महिमानगड, पिंगळी, नरवणे अशा १९ गावांमधील रुग्णांना तातडीचे व अधिकचे उपचार मिळण्यासाठी फायदा होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनाचा भविष्यातील धोका ओळखून जिल्हा परिषदेने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
फोटो: १९ पळशी
माण तालुक्यातील पळशी प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.