सातारा : बंद पडलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी घड्याळाच्याच चिन्हावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव असाच नारा देऊन घराणेशाही संपविणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दीपक पवार पुढे म्हणाले,२०१४ च्या निवडणुकीत भाजपला सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार मिळत नव्हता. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी केल्यानंतर मला निवडणूक लढविण्यास सांगितले. शेवटच्या दिवशी भाजपची उमेदवारी मिळाली. प्रचारासाठी अवघे १२ दिवस शिल्लक असल्याने मतदारसंघात फारसे फिरत आले नाही. तरीही विरोधी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात चांगली मते घेतली.
या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्याचा पुढील आमदार आपल्याला भाजपचा करायचा म्हणून सांगितलं. त्यासाठी मतदारसंघात पाच वर्षे फिरतोय. प्रत्येक घरात पक्ष नेला. सातारा नगरपालिकेत प्रथमच भाजपचं पॅनेल टाकलं. तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी जावळीतून मताधिक्य दिलं. त्यानंतर जावळी आपल्या मागे नाही, हे ओळखूनच शिवेंद्रसिंहराजे भाजपात आले.भाजपच्या वरिष्ठांनी शिवेंद्रसिंहराजेंना पक्षात घेतले आणि साताऱ्याच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. यावरून आमचे कार्यकर्ते म्हणाले, सातारा-जावळी विधानसभेची निवडणूक लढवायची. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. २२ सप्टेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी पक्षप्रवेश करणार आहे. सातारा विधानसभेची निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढविणार असून, शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव नारा देत त्यांची घराणेशाही संपविणार आहे. या निवडणुकीत माझ्याबरोबर भाजपचे अनेक बुथप्रमुख आणि पदाधिकारी असणार आहेत, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.वसुलीच्या महामंडळाकडे एक रुपयाचाही फंड नाही...पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ हे बंद पडलेलं आहे. त्याचं गॅझेटही झालेलं नाही. मी महामंडळ घेत नसतानाही ते मला दिलं. हे एक प्रकारचं गाजर दाखविण्याचं काम झालं असून, महामंडळाकडे एक रुपयाचा फंडही नाही. उलट ७०० कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे एकप्रकारे हे वसुलीचंच महामंडळ आहे का काय ? असा प्रश्न पडतो. भाजपने माझी प्रतारणा केली असलीतरी मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविषयी माझ्या मनात रोष नाही. फक्त शिवेंद्रसिंहराजेंना हटविण्यासाठीच हा निर्णय घेतलाय, असेही दीपक पवार यांनी स्पष्ट केले.