सातारा : अल्पवयीन मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिला वारंवार त्रास देऊन तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून तिच्या घरच्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संगमनगर येथील युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी संबंधित युवकाला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे. प्रकाश लक्ष्मण राऊत असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, पीडित १६ वर्षीय मुलगी सातारा तालुक्यातील एका गावात राहते. प्रकाश लक्ष्मण राऊत (वय २५, रा. गुरुदत्त कॉलनी, संगमनगर, ता. सातारा) हा सातत्याने तिच्या घराच्या शेजारी जायचा आणि तिच्याशी वेगवेगळ्या मार्गाने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. माझ्याशी लग्न कर म्हणून त्याने मुलीच्या मागे तगादा लावला होता. मात्र, पीडित अल्पवयीन मुलीने त्याला नकार दिला. तरीही प्रकाश तिचा वारंवार पाठलाग करत होता. पीडित अल्पवयीन मुलगी प्रकाशला सातत्याने नकार देत असल्यामुळे दोघांचे जुने फोटो सोशल मीडियावर अपलोड करून, मुलीच्या घरच्यांची बदनामी करण्याचा तो प्रयत्न करीत होता.
दरम्यान, प्रकाशकडून सातत्याने त्रास देण्याचा प्रकार सुरू राहिल्यामुळे पीडित मुलीने त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रकाशला मंगळवार, दि. १८ रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.