सातारा - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटी मतदारसंघासाठी सातारा येथे शांततेत मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेत ४१६ पैकी ३९७ मतदारांनी सहभाग नोंदवला. या मतदानाची टक्केवारी ९५.४३ टक्के इतकी असून या मतांची मोजणी आज मंगळवार सकाळी (ता. २३) साताऱ्यात होत आहे. सकाळी हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांचा 1 मताने धक्कादायक पराभव झाला आहे. तर, खटाव मतदारसंघातून अजित पवारांनचे उमेदवार नंदकुमार मोरे हेही पराभूत झाले आहेत.
खटाव सोसायटी गटात प्रभाकर घार्गे १० मतांनी विजयी झाले आहेत. नंदकुमार मोरेंना ४६ मतं तर प्रभाकर घार्गे ५६ मतं मिळाली आहेत. नंदकुमार मोरेंचा पराभव हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का मानला जातो. कारण, अजित पवार यांनीच मोरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं होतं.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील विजयी
कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. येथील लढत पालकमंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र उदयसिंह पाटील यांच्यात झाली. येथून बाळासाहेब पाटील हे 74 इतकी मते घेऊन विजयी झाले असून त्यांनी उदयसिंह पाटील यांचा 8 मतांनी पराभव केला आहे.
शिशिकांत शिंदेंचा पराभव
जिल्हा बँकेच्या जावळी मतदारसंघासाठी एकूण 49 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यापैकी शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून 25 मतं घेत रांजणेंनी विजय मिळवला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून पहिला निकाला हाती आला. त्यामध्ये, आमदार शशिकांत शिंदेंचा पराभव झाला आहे.