साहिल शहा ।कोरेगाव : जेमतेम शिक्षण घेतलेल्या कोरेगावच्या विठ्ठल मदनेला सतत मोठी होण्याची स्वप्ने पडायची. शिक्षण नसले तरी इंटरनेट तंत्रज्ञानाची मात्र त्यांला खडा न् खडा माहिती होती. त्यातूनच परदेशातील शेकडो विद्यापीठांच्या वेबसाईट्स विठ्ठल मदनेने पालथ्या घातल्या अन् तेथूनच त्याच्या डोक्यात आंतरराष्ट्रीय बोगस आॅनलाईन विद्यापीठ सुरू करण्याची आयडीया आली.
२०१२ रोजी त्याने आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही आॅनलाईन युनिव्हर्सिटी सुरू केली. आॅनलाईन असल्याकारणाने त्याचे स्वतंत्र आकर्षक संकेतस्थळ त्याने तयार करून घेतले आणि त्याद्वारे त्याने पैसे उकळण्याचा धंदाच सुरू केला. विशेष म्हणजे कोरेगाव सोडाच; पण सातारा जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला बरोबर न घेता, त्याने विद्यापीठाचा बाजार मांडून पदव्या देण्याचा धडाका लावला.
विठ्ठल मदने ही सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती. वडिलांनी निमशासकीय सेवेत आयुष्य खर्ची घातले. मात्र, वेगळे काही तरी करून दाखविण्याच्या कल्पनेने झपाटलेला विठ्ठल मित्रांच्या गराड्यातून बाहेर पडत एकाकी राहू लागला. त्याने सर्वप्रथम नेहरू युवा मंडळाची स्थापना केली आणि त्यातून त्याचा सातारा या जिल्हा मुख्यालयाशी संपर्क वाढू लागला. दररोज अनेक लोक भेटू लागले आणि त्यातून उच्चविद्याविभूषित होण्याची महत्त्वाकांक्षा वाढू लागली.त्याने नाशिकच्या नेचरकेअर इन्स्टिट्यूटमधून १९९९ मध्ये पदवी मिळवली आणि त्यापाठोपाठ २००१ मध्ये कोलकत्ताच्या इंडियन बोर्ड आॅफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन्समधून ‘एमडी’ ही पदवी संपादन केली. याच बोर्डाकडून २०१६ मध्ये त्याने फेलोशीपदेखील मिळविली असल्याचे त्याने बायोडाटामध्ये म्हटले आहे.
कोरेगावात सुरुवातीला त्याने प्रयत्न केले आणि शहरातील नवीन एसटी स्टँड रस्त्यावर एका बहुमजली इमारतीत स्वत:चे कार्यालय थाटले. अर्जुन चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून कामदेखील सुरू केले. कोरेगावात काही केल्या यश येत नसल्याचे पाहून, त्याने साताऱ्यातून नशीब आजमावले. मात्र त्यातही यश आले नाही. अखेरीस त्याने इंटरनेटच्या महाजाळ्यास आपलेसे केले. तेथूनच उन्नतीचे अनेक मार्ग खुले झाले.सहकारी मजूर सहकारी संस्था घेतली ताब्यातविठ्ठल मदने याने सहकार क्षेत्रातदेखील उतरण्याची तयारी केली होती. त्याने सातारा तालुक्यातील एका गावातील मजूर सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले होते. संस्थेसाठी त्याने तब्बल सव्वादोन लाख रुपये मोजले असून, सद्य:स्थितीत या संस्थेची सूत्रे त्याच्या हाती नसली तरी कागदोपत्री तोच पदाधिकारी आहे, हे तपासामध्ये पुढे आले आहे. या संस्थेसाठी त्याने मोजलेली रक्कम पदवी घेणाºया लोकांकडून घेतली आहे काय ? याचा तपास पोलीस करत आहेत.पदवीची खातरजमा करावी..नोकरीत पदोन्नती मिळावी म्हणून लोक विठ्ठल मदनेच्या विद्यापीठामध्ये रांग लावत होते. त्याच्या विद्यापीठातून घेतलेल्या पदवीद्वारे अनेकांना पदोन्नतीही मिळाली असल्याचे बोलले जात आहे. ज्या लोकांनी विठ्ठल मदनेच्या विद्यापीठाची पदवी सादर केली आहे, अशा लोकांचीही आपापल्या संस्थांनी चौकशी करावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे.