विद्यानगरमध्ये कचरा
कऱ्हाड : विद्यानगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत़. ओला व सुका कचरा विखुरल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कृष्णा कॅनॉल तसेच पुलानजिक मोठ्या प्रमाणावर कचरा साचत आहे. ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी साचलेला कचरा हटविण्याची मागणी होत आहे.
बाजारपेठेत गर्दी
मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या मल्हारपेठ येथे खरेदीसाठी गर्दी होत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे कपड्यांसह भांड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. मल्हारपेठ ही विभागातील मोठी बाजारपेठ असून, कापड व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
रस्त्याची दुरवस्था (फोटो : १०इन्फो०२)
कार्वे : कार्वे गावाजवळील धानाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचला असून, खड्डेही पडले आहेत. याचा त्रास भाविकांना सहन करावा लागत आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांनी केली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शेड उभारा
तांबवे : वसंतगड (ता. कऱ्हाड) येथे बसथांबा शेड नसल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना रस्त्यावरच बसची वाट पाहात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या अन्य वाहनांपासून विद्यार्थी व प्रवाशांच्या जीवाला धोका आहे.