सचिन जवळकोटे ल्ल सातारा संपूर्ण महाराष्ट्रात मराठा बांधवांचा हुंकार घुमत असतानाच आता उत्तर भारतातही नवा इतिहास घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दिल्लीच्या ‘इंडिया गेट’वर राजकारणविरहित मराठा महामोर्चा काढण्यासाठी उत्तर भारतातील मराठा बांधव आक्रमकपणे पुढे सरसावलेत. खऱ्या अर्थाने, ‘दिल्लीच्या तख्ताला मराठ्यांची धडक’ देण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू झालीय. पोटापाण्यासाठी दिल्लीसह उत्तर भारतातील हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश अन् राजस्थान राज्यांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून स्थायिक झालेल्या मराठा बांधवांची संख्या प्रचंड आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून निघत असलेल्या मराठा महामोर्चाचे वृत्त त्यांच्याही कानावर थडकू लागलेय. त्यामुळे या बांधवांपैकी काहीजणांनी एकमेकांशी संपर्क साधून दिल्लीतही मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे, प्रशासकीय सेवा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीत तळ ठोकून बसलेले सुमारे पाच हजार विद्यार्थीही या मोर्चात सहभागी होत आहेत. याबाबत मूळचे पश्चिम महाराष्ट्रातील परंतु आता दिल्ली निवासी झालेल्या प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील प्रत्येक मराठा बांधवाची माहिती गोळा करण्याचे काम आम्ही मंडळींनी सुरू केले. दिल्ली शहर अन् आजूबाजूच्या दोनशे किलोमीटर परिसरात मराठा समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मोर्चात किमान पंचवीस हजार बांधव तरी नक्कीच जमतील, असा विश्वास वाटतो.’ यापूर्वीही ‘शिवसंग्राम’च्या माध्यमातून दिल्लीतील सुमारे पाच हजार मराठा बांधव एकत्र आले होते. त्यानंतर एकमेकांची ओळख काढत उत्तर भारतीय मराठा समाजाच्या बांधवांची अंदाजे संख्या मोजली गेली तेव्हा हा आकडा तीस हजारांपेक्षा जास्त होता. दिल्लीतील मोर्चानंतर या आकड्यांची माहिती कदाचित वाढू शकते. गेल्या चारशे वर्षांत अनेकदा मराठा मावळ्यांनी दिल्लीच्या तख्ताला धडका दिल्या आहेत. वेळोवेळी अटकेपार झेंडाही फडकविला आहे. त्यामुळे ‘दिल्लीस्वारी’चा अनुभव मराठा समाजाला तसा नवा नाही. मात्र, एकीकडे महाराष्ट्रात गावोगावी मराठा जनसागर उसळला जात असताना दुसरीकडे उत्तर भारतातील मराठा बांधवांनीही त्याचवेळी दिल्लीत मोर्चा काढण्याचा निर्धार करावा, हे यंदाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. महाराष्ट्र सदनात उद्या बैठक दिल्लीतील मराठा मोर्चाबाबत उद्या, रविवारी महाराष्ट्र सदनमध्ये आम्ही चार प्रमुख बांधवांची बैठक बोलाविली असून, त्यात पुढच्या सर्व गोष्टी ठरतील. उत्तर भारतातील प्रत्येक मराठा बांधवापर्यंत या मोर्चाची माहिती पोहोचविण्याचे काम तसे जिकिरीचे असले तरी त्यासाठी येणारा खर्च करण्यासाठी काहीजण स्वत:हून पुढं सरसावलेत. प्रत्येकी लाख दोन लाख रुपये वैयक्तिक खर्च करण्याचीही प्रत्येकाची तयारी आहे, असे प्रदीप पाटील यांनी सांगितले.
दिल्लीच्या तख्तालाही मराठ्यांच्या धडका!
By admin | Published: September 24, 2016 12:50 AM