महाबळेश्वर : ‘अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या ८५ गावांमधील लोकांपर्यंत सर्व सोयी-सुविधा पोहोचवा, मदतीपासून एकही गाव वंचित राहता कामा नये,’ अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासनातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांना संपर्क तुटलेल्या गावांमध्ये सर्वतोपरी मदत पोहोचविण्याची सूचना केली. या बैठकीला प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, बाळासाहेब भिलारे, तहसीलदार सुषमा चैधरी पाटील, राजेंद्र राजपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेश गोंजारी, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, गटविकास अधिकारी नारायण घोलप, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, वनक्षेत्रपाल आर. सी. परदेशी, वनरक्षक लहू राऊत आदी मान्यवरांसह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अंबेनळी घाट तीन ठिकाणी तुटला आहे तर २ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दरड कोसळली आहे. महाबळेश्वर - तापोळा रस्त्याचीही अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे हे दोन्ही प्रमख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. हे दोन्ही रस्ते बंद असल्याने पर्यायी मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाबळेश्वर - तापोळा मार्गावरील वाहतूक लवकर सुरू होईल; परंतु अंबेनळी घाट रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. महावितरणचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्याअभावी वीज सुरळीत करण्यासाठी गावात पोहोचता येत नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
‘अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता गावागावात पोहोचावे. गावात जे-जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे तत्काळ सुरू करा, मदतीसाठी लोकांपर्यंत पोहोचा’, अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या.
या बैठकीला आगार व्यवस्थापक नामदेव पंतगे, पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी, संजय जंगम, दत्तात्रय वाडकर, सुरेश सावंत, तौफिक पटवेकर, रोहित ढेबे, विशाल तोष्णीवाल, संदीप मोरे, शरद बावळेकर, प्रवीण भिलारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट...
अनेक गावांमधील वीज गायब...
गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. तालुक्यातील रहदारीचे सर्वच प्रमुख रस्ते तुटले आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तालुक्यातील ११३ गावांपैकी पश्चिम भागातील ८५ गावांचा संपर्क तुटला आहे. यापैकी अनेक गावांमधून वीज गायब झाल्याने मोबाईलही बंद पडले आहेत. अनेक ठिकाणी आता संपर्क करणेही अवघड झाले आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
२५ महाबळेश्वर
महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.