शेंद्रे : जिल्ह्यातील निम्याहून जास्त महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून जास्तीची फी वसूल केलेली आहे. जास्तीची घेतलेली फी विद्यार्थ्यांना परत करावी आणि ज्या कारणासाठी विद्यार्थ्यांकडून फी घेतलेली आहे, ती साधने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जावीत आणि जी महाविद्यालये हे करणार नाहीत, त्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, वाढीव शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणार असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते. त्यांनी विद्यापीठाशी संलग्न स्वायत्त महाविद्यालयांनाही शुल्कवाढ करता येणार नाही. असे निदर्शनास आले तर संबंधित महाविद्यालयांवर कडक कारवाई केली जाईल तसेच सध्याच्या काळात केवळ शैक्षणिक शुल्क आकारता येईल, असे सांगितले होते. तरीही जिल्ह्यात अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून जास्तीची फी वसूल केलेली आहे अशा सर्व महाविद्यालयांची चौकशी करून कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शुभम ढाले, संकेत माने, रश्मी लोटेकर, रोहित क्षीरसागर, हर्षदा पिंपळे, राहुल आवळे उपस्थित होते.