चाफळ : ‘पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील दत्तकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा कारभार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याची चौकशी करुन अहवाल पाठविण्यात दिरंगाई करणाऱ्या पाटण येथील सहाय्यक निबंधक संजय पवार व त्यांचे सहकारी बी. जे. शेळके यांच्यावर सेवा व दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कारवाई करावी,’ अशी मागणी निसरे येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनिषा चव्हाण व त्यांच्या पतीनी कोल्हापूर येथील विभागीय सहाय्यक निबंधंकांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील दत्तकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने अनेक गैरव्यवहार करत बोगस कर्जप्रकरणे केली आहेत. ग्राहकांच्या सामान्य कर्ज व तारण कर्जावर चक्रवाढ व सावकारी व्याज लावून ग्राहकांची लूट केली आहे. याबाबतीत श्रेणी १चे बी. जे. शेळके व सहाय्यक निबंधक संजय पवार यांच्याकडे अनेकवेळा पुराव्यानिशी तक्रारी दाखल करुनही त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्याचबरोबर बी. जे. शेळके यांच्यादेखील पतसंस्थेत गैरव्यवहार व अपहार झालेले आहेत. त्यावरही पुराव्यानिशी तक्रार अर्ज करुनही कोणतीच कारवाई केली जात नाही.