वाठार स्टेशन : पावसामुळे सातारा - कोंडवे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शिवाय रुंदीकरणाच्या कामामुळेदेखील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. एका बाजूचा रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला असून, दुसऱ्या बाजूला खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गाची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून केली जात आहे.
वाहतुकीच्या कोंडीने वाहनधारक हैराण
सातारा : संचारबंदीचे निर्बंध शिथील झाले असून, बाजारपेठ सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे साताऱ्यात खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. शहरातील तांदूळ आळी, चांदणी चौक व खण आळी या परिसरात वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. अनेक खासगी तसेच मालवाहतूक करणारी वाहने रस्त्याकडेला लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याचा पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नैसर्गिक ओढ्यांत कचऱ्याचे साम्राज्य
सातारा : घंटागाडी दारात येऊनही नागरिकांचे ओढ्यात कचरा टाकण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. ठिकठिकाणच्या नैसर्गिक ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबवून शहरातील सर्व नाले, ओढे कचरामुक्त केले होते. मात्र, पावसाने उघडीप देताच बहुंताश ओढे कचऱ्याने पुन्हा भरले आहेत. ओढ्यात कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ
सातारा : शासनाने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली. त्यानुसार सातारा पालिकेकडून शहरात प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली. या अनुषंगाने विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांसह तत्सम वस्तू जप्त करून दंडही वसूल करण्यात आला. मात्र, ही मोहीम गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने शहरातील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ झाली आहे. पालिकेने प्लास्टिकविरोधी कारवाई सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
‘मार्निंग वॉक’ला नागरिकांची गर्दी
सातारा : लॉकडाऊन शिथील झाल्याने सातारकर मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले आहेत. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सचे पालन करण्याबरोबरच सुरक्षेची पुरेपूर काळजीदेखील घेतली जात आहे. अजिंक्यतारा किल्ला, मंगळाई देवी मंदिर, चार भिंती, कुरणेश्वर, यवतेश्वर याठिकाणी नागरिक मॉर्निंग वॉकला येत आहेत. सध्या थंडीची तीव्रता वाढल्याने वयोवृद्ध नागरिकांची संंख्या मात्र कमी झाली आहे.