सातारा : फ्लॅट खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कºहाड तालुक्यातील एका परिचारिकेकडे शरीरसुखाची मागणी करत तिची १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना साताºयात घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात वकिलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नारायण मारुती चौधरी (रा. दादाभाई चाळ, परेल, मुंबई) व अॅड. शिवराज चंद्रकांत पवार (रा. शनिवार पेठ, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. ३० वर्षीय परिचारिकेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना कºहाड येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी १५ लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यांचे नातेवाईक असलेल्या किरण मोरे यांनी अॅड. शिवराज पवार व नारायण चौधरी यांची ओळख करून दिली. पवार व चौधरी यांनी ‘आम्ही मुंबई येथील गोडबोले ट्रस्टचे पदाधिकारी असून, तुम्हाला साडेपाच टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देतो,’ असे आमिष दाखवले.कर्जासाठी १ लाख शेअर्स रक्कम व दोघांचे २६ हजार रुपये कमिशन असे एकूण १ लाख २५ हजार रुपये दोघांच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर चौधरी याने परिचारिकेस १६ लाख ७० हजार ३५० रुपयांचा चेक दिला. तो त्यांनी बँकत जमा केला असता बाऊन्स झाला. याचा जाब विचारला असता चौधरी याने कर्ज पाहिजे असेल तर अश्लील भाषेत शिवीगाळ करून शरीरसुखाची मागणी केली. तसेच शिवराज पवार याने खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर परिचारिकेस फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
साताऱ्यात कर्जासाठी शरीरसुखाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:22 PM