सातारा : शहरातील सदर बझार व परिसरात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सदर बझार परिसरात ठिकठिकाणच्या गटारी कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत तर सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वातावरणात बदल
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे तापमानातही सतत चढउतार होत आहे. पावसामुळे सर्वत्र थंडीची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाने मंगळवारी साताऱ्याचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. महाबळेश्वरचा पाराही रविवारी १८ अंशांवर स्थिरावला.
कोळशाला मागणी
महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढले असून, या थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळशाला मागणी वाढू लागली आहे. पावसामुळे घरोघरी कोळशाच्या शेगड्या पेटू लागल्या आहेत. यासाठी लागणारा कोळसा हा परजिल्ह्यातून आयात केला जातो. सध्या २५ ते ३० रुपये किलो या दराने कोळशाची विक्री सुरू आहे.
फांद्या हटविल्या
सातारा : वीज वितरण कंपनीकडून मंगळवारी दिसवभर वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या धोकादायक फांद्या हटविण्याचे काम करण्यात आले. या फांद्या वाहनधारक तसेच पादचाऱ्यांच्या अंगावर पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे वीज वितरण कंपनीने धोकादायक फांद्या हटविण्याचे काम तातडीने हाती घेतले. या कामामुळे शहराच्या काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
दुरुस्तीची मागणी
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळीच रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून, खडी रस्त्यावरून आली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ठरू लागले आहे. बांधकाम विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रिफ्लेक्टरची मागणी
शेंद्रे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते लिंबखिंड या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरला अभाव जाणवत आहे.
कारवाईला ब्रेक
सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर पालिकेकडून काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र, ही मोहीम आता पूर्णपणे थंडावली आहे.
नियमांचे उल्लंघन
सातारा : संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. संचारबंदीच्या अटी शिथिल केल्या नसताना बाजारपेठेत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढीचा धोका निर्माण होऊ शकतो.
झुुडपांचे साम्राज्य
किडगाव : पावसामुळे सातारा-वाई मार्गावर असेल्या वर्ये पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहे. या झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी या झुडपांचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आधीच धोकादायक वळण त्यात झुडुपांचे साम्राज्य वाढल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे.