विजेचा वापर वाढला
सातारा : मार्च हिटमुळे उन्हाच्या झळा वाढल्या असून, कूलर, एसीचा वापरही वाढला आहे. जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिकांकडून पंखा, कूलर, एसीचा वापर वाढला आहे. या सर्व वस्तू विजेवर चालणाऱ्या असल्याने परिणामी विजेचा वापरही वाढला आहे. नागरिकांना वाढत्या बिलांचाही सामना करावा लागतो आहे.
स्ट्रॉबेरीला मागणी
सातारा : महाबळेश्वरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली असून, त्यांच्याकडून स्ट्रॉबेरीला मागणी वाढत आहे. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये सध्या चारशे रुपये किलो दराने स्ट्रॉबेरीची विक्री सुरू आहे. त्यामुळे मागणी वाढत आहे.
वसुली मोहीम सुरू
सातारा : मार्चअखेरीमुळे ग्रामीण भागातही ग्रामपंचायतीकडून घरपट्टी तसेच पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू झाली आहे. आर्थिक वर्षाअखेरीमुळे संस्थांचे ऑडिट व वार्षिक जमाखर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून करवसुलीसाठी तगादा सुरू झाला आहे.
अपघाताला निमंत्रण
सातारा : झेडपी चौकात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोपऱ्यावर बंदिस्त गटाराच्या धोकादायक चेंबरमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. जिल्हा बँकेच्या परिसरात अनेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे कार्यालय असल्याने या परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते.
साताऱ्याच्या बाजारपेठेत आंबा दाखल
सातारा : कोेरोनाचा फटका सर्वच घटकांना बसत आहे. कोकणातील आंब्यालाही त्याचा फटका बसला आहे. आंब्याची निर्यात रोडावली आहे. त्यामुळे परदेशांत व परप्रांतांत आंबा कमी प्रमाणात निर्यात होत आहे. सातारा मार्केट यार्डात आंब्याची आवक वाढू लागली आहे. एका बॉक्सचा दर ६०० ते ८०० रुपयांवर गेला आहे. हंगामाच्या सुरुवातीला जेमतेम पेट्यांची आवक सातारा बाजार समितीच्या फळबाजारामध्ये होत असते.
पाण्यासाठी जागरण
सातारा : कुसुंबी मुरा (ता. जावळी) येथील आखाडेवाडीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. रात्र उंच कड्याकपारींत झऱ्याचे पाणी मिळविण्याच्या कसरती कराव्या लागत आहेत.
शेतकरी अडचणीत
सातारा : मार्च २०२० मध्ये दुधाचे दर प्रतिलिटर वीस ते बावीस रुपयांवर आल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. कोरोना महामारीची भयावह परिस्थिती, पशुखाद्य व चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. ग्रामीण भागात शेतीला महत्त्व आहे.
हळदीची आवक
सातारा : शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डवर हळद या शेतमालाचे जाहीर लिलाव नियमितपणे सुरू आहेत. मार्केट यार्डवर दररोज हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. हळदीचे दर सरासरी दर आठ हजार ते १४ हजारप्रमाणे आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल निवडून आणावा.
अपघाताचा धोका
सातारा : साताऱ्यात राजपथावर अनेक वाहनचालक थरार निर्माण करीत आहेत. वाहने वेगाने दामटण्याचे उद्योग धूमस्टाईल दुचाकीस्वार करीत असून, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. देवी चौकात तर दररोजच धडकाधडकी होत आहे. यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
परसणी घाटात वणवा
वाई : पसरणी घाटात लागलेल्या वणव्यामुळे सुमारे १३ किलोमीटरचा डोंंगर जळून खाक झाला आहे. दहा दिवस सलग वणवा लागल्याने तालुक्यातील सर्वच डोंगर काळेकुट्ट झाले आहेत. दहा वर्षे वाढविलेली व जोपासलेली झाडे अवघ्या दहा दिवसांतच खाक झाली आहेत. पर्यावरणप्रेमींमध्ये याबद्दल नाराजी आहे.