स्वच्छतेची मागणी
सातारा : कोरोनाचे संक्रमण कमी होताच, शहरातील सदर बझार परिसरात साथरोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. ठिकठिकाणची गटारे कचऱ्याने तुडुंब भरली आहेत, तर सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. याचा नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वातावरणात बदल; तापमानही वाढले
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या काही दिवसांपासून बदल होत असून, तापमानाही सतत चढउतार होत आहे. हवामान विभागाने सोमवारी साताऱ्याचे कमाल तापमान ३१.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. महाबळेश्वरचा पाराही सोमवारी २१.२ अंशांवर स्थिरावला.
अजिंक्यतारा रस्ता
दुरुस्तीची मागणी
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळीच रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून, खडी रस्त्यावर आली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ठरू लागले आहे. बांधकाम विभागाने रस्त्यावरील खडी दूर करून तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारक, तसेच नागरिकांमधून होत आहे.
वर्ये पुलावर घाणीचे साम्राज्य
किडगाव : पावसामुळे सातारा-वाई मार्गावर असेल्या वर्ये पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली असून, या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. परिसरातील अनेक नागरिक येता-जाता या पुलाजवळ कचरा टाकतात. या परिसराची कधीच स्वच्छता केली जात नसल्याने कचरा कुजल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.