सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कऱ्हाड, माण, खटाव, फलटण आदी तालुक्यांत शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. ज्वारी, गहू, हरभऱ्याचे अधिक नुकसान आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत. तसेच तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.चार दिवसांपूर्वी अचानक आलेल्या जोराच्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, शाळू व हरबरा पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या सर्वत्र ऊसतोडणी सुरू आहे. पावसामुळे ऊसतोडणीची कामे ठप्प झाली तर आडचाली ऊस पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. पावसाने गहू, शाळू, हरबरा अशा रब्बी हंगामातील पिके काही ठिकाणी भुईसपाट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे . सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टमाटा, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय पिकेही घेतली जातात. भेंडी, गवारी, गेवडा यांसारख्या शेंगवर्गीय भाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे, तर जोराच्या वाऱ्याने वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तोडलेला ऊस शेतातून बाहेर काढता येत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अनेक ठिकाणी आडचाली ऊस पीक भुईसपाट झाल्यामूळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.