सातारा: व्हिडीओ गेम पार्लर चालवणाऱ्याला मारहाण करत पाच हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना अजंठा चौकात मंगळवारी रात्री घडली.सोपान उर्फ काका बाबुराव शेंडगे (रा. धनगरवाडी, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सुरज संजय मुळीक (रा. धामनेर, ता. कोरेगाव) हे अंजठा चौकातील व्हिडीओ गेम पार्लरमध्ये काम करत होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या शेडगे याने तू आमच्या परिसरात हे दुकान चालवतोस, तुला दुकान चालू ठेवायचे असेल तर मला पाच हजार रुपये खंडणी द्यावे लागतील, असे सांगितले. त्यास तक्रारदाराने नकार दिल्यामुळे चिडलेल्या संशयिताने त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जाताना व्हिडीओ गेम चालवण्यासाठी असलेली मशिन जबरदस्तीने नेली. संशयिताने यापूर्वीही वेळोवेळी खंडणी म्हणून एक लाख रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील हे करत आहेत.
- बिल मागितल्यामुळे हॉटेल मालकाला मारहाण
सहाजणांवर गुन्हा : खुर्च्यांचीही तोडफोडसातारा: जेवण झाल्यानंतर बिल मागितल्याने हॉटेल मालकाला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना वळसे, ता. सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल राजधानी येथे मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी गणेश दिलीप घाडगे, रणजीत सूर्यवंशी, सुरल सूर्यवंशी, अमोल घाडगे, सुरज घाडगे (सर्व रा. कामेरी, ता. सातारा) महेश घोरपडे (रा. नांदगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सनी अशोक कदम (रा. शेंद्रे, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वळसे गावच्या हद्दीतील हॉटेल राजधानी येथे मंगळवार दि. १ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वरील संशयित जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर बिल घेण्यासाठी हॉटेलचे मालक सनी कदम हे गेले असता बिल मागितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन संबंधितांनी शिवीगाळ करत हाताने लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने कदम यांच्या मित्राच्या कपाळावर मारून निघून गेले. यावेळी संशयितांनी हॉटेलमधील खुर्च्यांची तोडफोड केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
- सीसीटीव्हीमुळे लागला चोरीचा छडा; युवकाला अटक
सातारा : आरतीच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन महिलेची पर्स चोरणाºया चोरट्याचा छडा सीसीटीव्हीमुळे लावण्यास पोलिसांना यश आले. चोरट्याकडून चोरीचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे.अरूण गोरख पिटेकर (वय ३५, रा. नामदेववाडी, ता. सातारा) असे अटक झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नवरात्रोउत्सवामुळे सध्या मोती चौकात सायंकाळच्या सुमारास आरतीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन बुधवारी सायंकाळी एका महिलेची पर्स व त्यातील पाच हजार आणि दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या प्रकारानंतर सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक भोसले व त्यांच्या टीमने मोती चौकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यामध्ये एक युवक कैद झाला होता. वर्णनावरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता अरूण पिटेकरचे नाव पुढे आले. पिटेकर हा राजवाडा येथून जात असताना होमगार्ड व पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने चोरीची कबुली दिली असून, चोरीचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे.