वाठार निंबाळकर : फलटण तालुक्यातील कोणत्याही गावातील कोरोना मृतदेहाचे दहन कोळकी स्मशानभूमीत करण्यात येते. गेल्यावर्षीपासून फलटण व परिसरातील कोरोना मृतदेहांचे येथे दहनही करण्यात आले. मात्र, स्मशानभूमीत अनेक दिवसांपासून वीज नसल्याने अंधारातच दहन कारावे लागत आहे. यामुळे स्मशानभूमीत तातडीने विजेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ यांनी केली आहे.
कोळकी गावातील स्मशानभूमी येथे वीज नसल्याने मृतदेह दहन करण्यासाठी येणाऱ्या कोरोनायोध्दा कर्मचारी व नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अंधारात वाहनांच्या विजेच्या प्रकाशात दहनकार्य उरकावे लागत आहे. दहन करणारे कर्मचारी कशाचीही पर्वा न करता आपले काम इमानेइतबारे करत आहेत. असे असले तरी स्मशानभूमी परिसरात एक हायमास्ट दिवा लाऊन अडचण थांबवावी, अशी मागणीही गोविंद भुजबळ यांनी केली आहे.