पिंपोडे बुद्रुक : सद्य:स्थितीत विविध क्षेत्रात लागू झालेल्या व आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या कामातून शिक्षकांना वगळण्याची मागणी कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निवेदनाद्वारे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू आहेत तसेच शिक्षकांना ऑनलाइन-ऑफलाइन अध्यापन करावे लागत आहे, अशा परिस्थितीत निवडणूक कामांमुळे शैक्षणिक कामांवर विपरीत परिणाम होत आहे. आरळे केंद्रातील बहुतेक शिक्षकांना निवडणुकीचे काम असल्यामुळे केंद्राच्या शैक्षणिक कामावरही विपरीत परिणाम होत आहे. या व अशा नुकसानकारक बाबी टाळण्यासाठी शिक्षकांना निवडणूक कामांतून वगळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सातारा तालुका शिक्षक समिती अध्यक्ष अनिल चव्हाण, कोरेगाव तालुका शिक्षक समिती अध्यक्ष नितीन शिर्के, शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव, शंकर शिंदे, धनाजी देशमुख, अमीर आतार, प्रवीण क्षीरसागर आदी उपस्थित होते.