- दीपक शिंदे, सातारा
जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार होतात. रुग्णांची व्यवस्थाही चांगली होते. पण, एकदा जम्बो सेंटरमध्ये रुग्ण गेल्यानंतर किमान दोन दिवस त्याबाबतची माहितीच कळत नाही. अनेकांना तर आपला रुग्ण दगावल्याचीच माहिती मिळते. त्यामुळे रुग्णाचे अंतिम दर्शन व्हावे यासाठी अनेकजण जम्बोच्या बाहेर थांबून राहतात. त्यांना मृताचा चेहरा दाखविण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी २०० ते ५०० रुपयांची मागणी केली जाते. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्या सारखाच हा दुर्देवी प्रकार आहे.
कोरोना बाधित झाल्यानंतर अनेक रुग्ण घरीच उपचार घेतात. श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली की मग रुग्णालयामध्ये जाण्याचे नियोजन केले जाते. ऑक्सिजन लेव्हल ७० पेक्षा कमी असेल तर अनेक रुग्णालये केवळ जम्बो सेंटरचेच नाव सुचवितात. त्यामुळे जम्बोवरही ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या आणि व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करुन घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. तरीही अनेकांच्या दबावामुळे रुग्णांना दाखल करुन घेतले जाते. पुढे त्यांना ऑक्सिजन लावला जातो की व्हेंटिलेटर हे जम्बोमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाच माहित. मात्र, दोन दिवसांनंतर रुग्णाची सर्व माहिती नातेवाईकांना दिली जाते.
जम्बोमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवस प्रकृती चांगली राहते. त्यामुळे नातेवाईकही निश्चिंत होतात. पण, एके दिवशी रुग्ण अत्यवस्थ असल्याचा आणि त्यानंतर दगावल्याचा फोन येतो आणि नातेवाईकांची हतबलता सुरु होते. रुग्णाला दाखल केल्यानंतर मागील चार पाच दिवसात डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारावरच त्यांनी समाधान मानलेले असते. त्यामुळे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईक आणि घरातील पत्नी, आई, मुले यांचा जीव कासावीस होत असतो. काही करुन त्यांना अंतिम दर्शन घडवायचे असते. खासगी रुग्णालयांमध्ये ते शक्य होते. पण, जम्बोमध्ये सरकारी नियम असल्यामुळे रुग्णांना कोविड बाधित मृताच्या जवळपास येऊ दिले जात नाही. याचा फायदा काही महाभाग घेऊ लागले आहेत. जम्बोमधून रुग्ण बाहेर काढून नगरपालिकेच्या ताब्यात देताना त्यांचा चेहरा बघण्यासाठी चक्क पैशांची मागणी होऊ लागली आहे. समोरची व्यक्ती पाहून २०० किंवा ५०० रुपयांची मागणी केली जात आहे. अशावेळी नातेवाईकही हतबल असतात. कुठे वाद घालायचा, सध्या परिस्थिती काय आहे याचा विचार करुन पैसे देण्यासाठी मागे पुढे पाहिले जात नाही. पण, असा होणारा प्रकार लाजिरवाणा आणि कर्मचाऱ्यांकडून माणुसकीला काळीमा फासणाराच आहे.
दररोज असते ५० हून अधिक जणांची यादी
जम्बो कोविडमध्ये आणि जवळपास मृत झालेल्या सर्वांना जम्बोमध्ये आणले जाते. त्याठिकाणाहून त्यांना नगरपालिकेच्या ताब्यात दिले जाते. दररोज मृत झालेल्या किमान ५० किंवा त्याहून अधिक लोकांची यादी येथील कर्मचाऱ्यांकडे असते. त्यामुळे प्रत्येकाकडून किमान ५०० रुपये घेतले तर एका दिवसात २५ हजारांची कमाई होते. पण, हा होणार प्रकार तिरस्कार आणि चीड आणणारा आहे.
नातेवाईकांच्या असहाय्यतेचा घेतला जातोय गैरफायदा
घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे मृत झाला असल्यास ते कुंटुंब अगोदरच खूप खचून गेलेले असते. अशावेळी अखेरच्या दर्शनासाठी घरातील लोक आग्रह करतात आणि मग सुरु होते फोनाफोनी. कुठेतरी वशिला लावण्याचा प्रयत्न होतो आणि मग व्यवस्था करतो म्हणून सांगितले जाते. याच कुटुंबाच्या असहाय्य आणि अगतिकतेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.
.........
जम्बो कोविड सेंटर बाहेर नगरपालिकेकडे बॉडी ताब्यात देताना अंतिम दर्शन केले जाते. याबाबत जम्बो हॉस्पिटल परिसरातच माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही प्रयत्न केले आणि आम्हाला अंत्यदर्शन घेता आले. एका व्यक्तीने प्लास्टिकच्या बँगमध्ये लपेटलेल्या शरीराच्या चेहऱ्याकडील चैन उघडली आणि चेहरा दाखविला. दुसऱ्याने मोबाईलने फोटो काढण्यास सांगितले. त्यानंतर बाजूला घेऊन पैशांची मागणी केली गेली. त्यावेळी अंत्यदर्शन होणे महत्वाचे असल्यामुळे आम्ही पैसे दिले आणि तिथून बाहेर पडलो. असे एका नातेवाईकाने सांगितले.