सातारा : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने आरोग्य विभागाने लस देण्याचा वेग वाढविला आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून आरोग्य विभागाने तब्बल ५ लाख डोसची मागणी केली आहे. मात्र, शासनाकडून नेमके किती डोस उपलब्ध होतील, हे शुक्रवारी पुण्याहून गाडी आल्यानंतर समजणार आहे.
जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस देण्यात येत आहे. अशी १३२ ठिकाणे असून या ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. ज्येष्ठ नागरिकांकडूनही लस घेण्यासाठी प्रतिसाद मिळत असून, १९ हजार २३९ ज्येष्ठांनी लस घेतली आहे. तसेच हेल्थ केअर वर्कर २२७०३, फ्रंटलाइन वर्कर १९९२४ जणांनी लस घेतली असून सर्व मिळून ६१ हजार ८६६ जणांना लस देण्यात आली आहे. हा आकडा वाढत असून, काही दिवसांत आणखी वेगाने लसीकरणाची केंद्रे उभारून तरुण व ज्येष्ठांना लस दिली जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.