कोयनानगर : कोयना धरणातील पाणी १ जून ते ३१ मे या तांत्रिक वर्षात कृष्णा पाणी वाटप लवादानुसार धरणाच्या पूर्व व पश्चिमेकडे विसर्ग केले जाते. चालू तांत्रिक वर्षातील ११ महिने संपले असून, अजून २३ दिवस शिल्लक असताना. कोयना धरणात ३४.२३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे वीजनिर्मिती व सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे.महाराष्ट्राचे वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणावर राज्याची वीज आणि शेती पिण्याच्या पाण्याची गरज भागवत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे संपूर्ण राज्याचे नेहमीच लक्ष असते. कोयना धरणाची १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असून, धरणातील पाण्यापासून सुमारे २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील ६७.५० टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी तर उर्वरित पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणीवाटप लवादानुसार १ जून ते ३१ मे या कालावधीसाठी हा तांत्रिक पाणी करार असतो. यावर्षी कोयना धरणाच्या १ जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील ८ मे पर्यंतचा कालावधी संपला असून तांत्रिक वर्ष संपायला काही दिवस शिल्लक असताना वीजनिर्मितीसाठी ६७.५० टीएमसीपैकी ५९.८१ टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी झाला असला तरी अजूनही ८.६९ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी शिल्लक आहे.कोयना पाणलोट क्षेत्रात जुलै, ऑगस्ट महिन्यांत पडलेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात पाण्याची ऐतिहासिक आवक झाल्याने कोयना धरण पूर्ण भरले होते. सोमवार, दि. ८ मेच्या सकाळपर्यंत धरणातून पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी ५९.८१ टीएमसी व पूर्वेला पायथावीजगृहातून पूरस्थिती व सिंचनासाठी सोडलेल्या ८९.३७ टीएमसी असा एकूण ९९.१८ टीएमसी पाण्याचा वापर करत कोयना जलविद्युत प्रकल्पातून एकूण २८५४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली आहे. धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी ७.२८ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. तर ०.०२ टीएमसी पाण्याची गळती झाली आहे. कर्नाटक राज्याने केलेल्या मागणीनुसार व महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागातील पाण्याची टंचाई भासत असल्याने कोयना धरणाच्या पायथावीजगृहातून २१०० व नदी विमोचकातून २१०० असा एकूण ४२०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.सध्या विजेची मागणी वाढली असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चारही टप्प्यांतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे.धरणातील वीजनिर्मितीसाठी ६७.५ टीएमसी पाणीसाठा आरक्षितपैकी ६० टीएमसी वापर झाला असून, सुमारे ६ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी शिल्लक आहे. गतवर्षी कोळसा टंचाई काळात सुमारे १५ टीएमसी पाण्याचा अतिरिक्त वापर करत ८२.६४ टीएमसी पाण्यापासून ३८७०.९० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली होती.
गतवर्षीप्रमाणे आताही अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी सात टीएमसी पाण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. -एस. जी. चोपडे, मुख्य अभियंता महाजनको, पोफळी