सातारा : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाची दडी असून, पश्चिमेकडेच उघडझाप सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरलाच सर्वाधिक ४० मिलिमीटरची नोंद झाली. तर सांगली जलसंपदा विभागाकडून सिंचनासाठी मागणी झाल्याने कोयनेच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण पाणीसाठा ८६ टीएमसीजवळ आहे.पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. तरीही यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे. पश्चिम भागात जेमतेम पाऊस झाला असलातरी पूर्वेकडे मात्र प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी पिके वाळून चालली आहेत. यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसी इतकी आहे. पावसाअभावी ही धरणेही भरलेली नाहीत.८० टक्क्यांच्या आसपास या धरणात पाणीसाठा आहे. त्यातच आणखी काही दिवस पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यंदा धरणे भरणार का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशातच अनेक भागांतून धरणामधून सिंचनासाठी पाणी साेडण्याची मागणी होत आहे. यामुळे प्रमुख धरणे भरणे गरजेचे आहे.रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १३ तर नवजाला १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरला ४० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस नवाजालाच ४९२८ मिलिमीटर झालेला आहे. तर कोयना येथे ३४५८ आणि महाबळेश्वरला ४६४० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ८५.७७ टीएमसी पाणीसाठा होता. तर धरणात ६२५९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.
सांगलीसाठी पायथा वीजगृहातून पाणी सोडले...सांगली जिल्हा सिंचन विभागाने कोयना धरण व्यवस्थापनाकडे सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे शनिवारी दुपारपासून कोयनेच्या पायथा वीजगृहातील एक युनिट सुरू करण्यात आले आहे. त्यातून १०५० क्यूसेक पाणी सांगलीसाठी सोडण्यात आलेले आहे. रविवारीही हा विसर्ग सुरूच होता.