सातारा : ग्रेड सेपरेटर हाॅरर शोसाठी मागितला जात आहे. म्हणजे इतका त्याचा उपयोग होत नाही, हेच यातून सिद्ध होतेय. मुळातच ग्रेड सेपरेटर हा सातारकरांच्या माथी मारण्यात आला असून, ही संकल्पनाच चुकीची आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला.जिल्हा शासकीय रुग्णालयातील एचआयव्हीग्रस्तांसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तीन लाखांची औषधे दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर वरील वक्तव्य केले. साताऱ्यातील एका मंडळाने ग्रेड सेपरेटर हा हाॅरर शोसाठी भाड्याने द्यावा, अशी मागणी पालिकेकडे केली आहे, असे पत्रकारांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना विचारल्यानंतर ते म्हणाले, मी ही सोशल मीडियावर हे वाचले आहे. ग्रेड सेपरेटरची त्यांची संकल्पनाच मुळाच चुकीची आहे. काहीही गरज नसताना लाखो रुपये खर्च करून सातारकरांच्या माथी हा ग्रेड सेपरेटर मारण्यात आला आहे.मी असं करतो, तसं करतो म्हणत संकल्पाची फलकबाजी करण्यात आली. सध्या झालेले ग्रेड सेपरेटरचे काम फोडता येईल का, हे इजिनिअरकडून तपासले पाहिजे. पुण्यामध्ये अशाप्रकारचे चुकीचे झालेले पूल पाडण्यात आले होते. त्यामुळे या ग्रेड सेपरटेरबाबतही पुन्हा विचार करायला हरकत नाही. तसे शासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.सिव्हिलमधील अस्वच्छता आणि डायलेसिसची कमतरता असल्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, यावर तोडगा काय काढणार, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना केला असता, आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सिव्हिलमध्ये सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतोय. रिक्त जागा भरण्यासाठी मी स्वत: आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच डायलेसिससाठी अनेक रुग्ण वेटिंगवर असतात. त्यासाठी स्वतंत्र डायलेसिस विभाग होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रेड सेपरेटर 'हॉरर शो'साठी भाड्याने देण्याची मागणी, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला
By दत्ता यादव | Published: September 28, 2022 8:03 PM