फलटण :
शहर पोलीस ठाण्यात माहिती घेण्यासाठी गेलेल्या आझाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश आवळे व अन्य पाच भीमसैनिक यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे यांनी केली आहे.
आझाद हिंद समाज पार्टीच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर भीमसैनिकांवरील अन्यायासंदर्भात घंटानाद आंदोलन करण्यात आले, त्यावेळी सनी काकडे बोलत होते. काकडे म्हणाले की, फलटण येथील एका पीडित कुटुंबाबाबत झालेल्या अन्यायाबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी काही भीमसैनिक गेले असता फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी आझाद हिंद समाज पार्टीचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश आवळे व इतरांसोबत गेलेल्या भीमसैनिकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केला असे भासवून गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सनी काकडे यांनी यावेळी केली. यावेळी वंचितचे सुभाष गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.