कऱ्हाड : सध्या आॅनलाईन खरेदी व विक्रीचे प्रमाण जास्त वाढले आहे. बदलत्या युगाबरोबर सर्वजण स्मार्ट झाले आहेत. शासनाच्या वतीने ई-गर्व्हनर सुविधा सुरू करण्यात आल्याने याचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ लागला आहे. अशाच प्रकारे शासनाच्या कऱ्हाड तालुका सामाजिक वनीकरण विभागाकडे २१ हजार १३६ रोपांची मागणी आली आहे. तर जिल्हा सामाजिक वनीकरण विभागाकडे ६ लाख ७७ हजार इतकी आॅनलाईन मागणीची नोंद झाली आहे. १ जुलै ते ७ जुलै हा कालावधी वनमहोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. विशेषत: या कालावधीत १ जुलै या एकाच दिवशी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वनविकास महामंडळ व इतर विभाग, शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था, निसर्ग संस्था, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये आदींमार्फत मोकळ्या जागेत २ कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्याही स्थापन करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याने शासनाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सातारा जिल्ह्याला ६ लाख २० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात ६ लाख ७७ हजार खड्डे वृक्षलावडीसाठी तयार आहेत. तर कऱ्हाड तालुक्यात २१ हजार १३६ खड्डे तयार आहेत.सामाजिक वनीकरण विभागामार्फत सध्या शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईनद्वारे जिल्ह्यात वृक्षलागवड करण्यासाठी आलेली रोपांची मागणी याची माहिती नोंदविण्यात आलेली आहे. जिल्ह्यासह प्रत्येक तालुकास्तरावरून दररोज आलेली माहिती ही सामाजिक वनीकरण विभागाच्या ‘महाफॉरेस्ट’ या वेबसाईटवर नोंदविण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे आॅनलाईन पद्धतीने मागणी व त्यांची नोंद करण्याची तारीख ही २५ जूनपर्यंत ठेवण्यात आलेली होती. सध्या आॅनलाईन नोंदीचे संकेतस्थळावरील अॅप हे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आलेले आहे. कऱ्हाड तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात एक वनक्षेत्रपाल, चार वनपाल, १७ वनरक्षक व वनमजुरांची संख्या चार आहे. या विभागामार्फत येथील लोकसहभागातून ४२ हजार ५०० रोपांची लागवड ही १ जुलै रोजी करण्यात येणार आहे. शासनाने जिल्ह्यास दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, आता जिल्ह्यात खोदण्यात आलेल्या ६ लाख ७७ हजार खड्ड्यांमध्ये १ जुलै रोजी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेस दीड लाख रोपांचे उद्दिष्ट दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेस दीड लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत तालुकास्तरावरील पंचायत समिती, ग्रामपंचायतींना वृक्षलागवडीबाबत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. दोन तासांत होणार वृक्षलागवडीची नोंद वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत आॅनलाईन माहिती नोंदविण्यासाठी नेमलेले साईट को-आॅर्डीनेटर हे १ जुलै रोजी प्रत्येक साईटवरती ठेवण्यात आलेल्या नियंत्रण अधिकारी हे दर दोन तासांनी वेबसाईटवर झालेली लागवडीबाबत माहिती मोबाईल अॅपद्वारे अपलोड करणार आहेत.
जिल्ह्यात आता रोपांंचीही ‘आॅनलाईन’ मागणी!
By admin | Published: June 28, 2016 11:22 PM