खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे श्वान ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. ग्रामपंचायतीने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर
लोणंद : बाजारपेठेत गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर आहेत. सध्या २० ते २५ रुपये किलो या दराने कांद्याची विक्री केली जात आहे. दर स्थिर असल्याने ग्राहकांमधून कांद्याला मागणी वाढली आहे. येत्या काही दिवसांत दर आणखीन उतरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
धोम, बलकवडीत पर्यटकांची गर्दी
वाई : वाई तालुक्यातील धोम व बलकवडी धरणाचा परिसर सध्या पर्यटकांना खुणावू लागला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणारे हौशी पर्यटक धोम, बलकवडीला भेट देऊन येथील सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. घोडेस्वारी तसेच नौकाविहाराला पर्यटक पसंती देत असून, शनिवार व रविवार हा परिसर पर्यटकांनी गजबजून जात आहे.
अजिंक्यताऱ्यावर सर्रास वृक्षतोड
सातारा : सातारा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीमुळे किल्ल्यावरील वृक्षसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रारंभी झाडाच्या ओल्या फांद्या तोडून त्या आहे त्याच जागेवर टाकल्या जातात. फांद्या सुकल्या की काही दिवसांनंतर त्याची मोळी बांधून नेली जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून किल्ल्यावर हा प्रकार सुरू आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मंडई परिसरात घाणीचे साम्राज्य
सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडी मुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. याअंतर्गत महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरातील कुंड्या हटविल्याने हा परिसर घाणीच्या विळख्यातून मुक्त होईल, असे वाटत असतानाच या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्याने विक्रेत्यांबरोबरच खरेदीसाठी येणाऱ्या अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पालिकेसमोरच जलवाहिनीला गळती
सातारा : पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ जलवाहिनीच्या एका वॉल्व्हला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. पालिकेने ही गळती कायमस्वरूपी काढावी, अशी मागणी होत आहे.
वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी वाहतुकीचे कोणतेच नियोजन नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अत्यावश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.