लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : दक्षिण मांड नदीला आलेल्या पुरामुळे नांदगाव येथील पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी केली. त्यावेळी दिवंगत यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांनी दूरदृष्टीने बनवलेला हा पूल असून, त्याची पुनर्बांधणी आपल्याकडून व्हावी, अशी भावनिक साद नांदगावमधील ग्रामस्थांनी डाॅ. भोसले यांना घातली.
कृष्णा कारखान्याचे राम-लक्ष्मण म्हणून यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांची राज्यभर ओळख होती. कृष्णा कारखाना परिसरात कृष्णा नदीच्या पाण्याने हिरवाई फुलत होती. उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून शेत शिवारात पाणी फिरले होते. पाचवड फाट्यापासून काले विभागापर्यंत नदीचे पाणी पोहोचले होते. येथील शेतकरी ऊसाचे पीक घेत होते. त्यावेळी नांदगाव व परिसरातील माळरान असलेली शेती ओलिताखाली यावी, हा उद्दात हेतू ठेवून या परिसरात पाणी योजना राबविण्यात आल्या.
त्यावेळी नांदगाव येथे जात असताना नदीच्या पात्रातून जावे लागत होते. पाणी योजना सुरू झाल्याने दळणवळणाचा प्रश्न उपस्थित झाला. १९७४मध्ये या दोन बंधूंनी ऊसाची वाहतूक विचारात घेऊन या नदीवर सुमारे १५० मीटर लांबीचा पूल बांधला. त्यामुळे येथील वाडी-वस्ती, लहान गावे यांची गैरसोय टळली. या पुलावरून अवजड वाहने ये-जा करू लागली. नदीचे पाणी अडविण्याची सोय झाली अन् शेकडो एकर शेती पाण्याखाली आली. गेली ४५ वर्षे हा पूल अनेकांचा आधार बनला आहे.
ग्रामस्थांनी या पुलामागे यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांच्या आठवणी जोडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आठवणी चिरकाल राहाव्यात, अशी भावना येथील जनतेची आहे. येथे नव्याने पूल बांधला जावा, यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी साद डॉ. भोसले यांना ग्रामस्थांनी घातली. त्यामुळे डॉ. भोसले यांनी यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, अशी जनतेची अपेक्षा आहे.
चौकट -
मागील दीड वर्षापासून या पुलासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. आता पुरामुळे पुलाचे नुकसान झाल्याने नवीन पूल बांधण्याच्या मागणीला जोर आला आहे. या मागणीकडे लोकप्रतिनिधी किती व कसे लक्ष देतात, हे पाहावे लागणार आहे.
नांदगाव (ता. कऱ्हाड) येथील पुलाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्याची पाहणी डॉ. अतुल भोसले व ग्रामस्थांनी केली.