औंध : प्रमुख रहदारीचा मार्ग असलेल्या गोपूज-पुसेसावळी रस्त्याच्या दुतर्फा झुडपे वाढली आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूचा अंदाज लावणे वाहनधारकांना अडचणीचे ठरत असल्याने ही झुडपे संबंधित विभागाने हटवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गोपूज-पुसेसावळी रस्त्यावरून वाहनांची कायम वर्दळ असते. अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. हा रस्ता पुसेसावळीपासून कडेपूर, कऱ्हाड, कोल्हापूर, तर गोपूजपासून वडूज, दहिवडी म्हसवडला जात आहे. गोपूजनजीक कारखाना असल्याने दुचाकीस्वार, ट्रॅक्टर वाहतूक, टँकरची वाहतूकही लक्षणीय असते.
पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यांच्या बाजूंची झुडपे बहरली आहेत.
यामध्ये काही काटेरी झुडपेही आहेत. ही झुडपे रस्त्याच्या दुतर्फा पसरली आहेत, तर पेट्रोल पंपाजवळील फरशी पुलावरची सुरक्षेसाठी लावण्यात येणारी दगडेही दिसत नाहीत. साइडपट्ट्याही व्यवस्थित दिसत नसल्याने, तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना गाडी क्रॉस होताना अंदाज येत नसल्याने खाली कोणी उतरायचे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे वाढलेली झुडपे हटविण्याची मागणी होत आहे.
फोटो : २४औंध-रोड
गोपूज-पुसेसावळी रस्त्याकडेची वाढलेली झुडपे हटविण्याची मागणी होत आहे. (छाया : रशिद शेख)