मसूर : पिंपरी ते रिसवड रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता गेले अनेक वर्षे दुरुस्ती केला नसल्याने दुरवस्थेत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित रस्ता हा शामगाव घाटातून खाली येऊन कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून बनविण्यात आला होता. मात्र, हा रस्ता उखडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हद्दीचे संरक्षण; पण स्वच्छतेची ऐशीतैसी
मलकापूर : शहरात दोन हजारांवर खुल्या प्लॉटपैकी बहुतांशी प्लॉटला हजारो रुपये खर्च करून वॉलकंपाउंड व गेट बसवून हद्दीबाबत पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. मात्र, अशा पद्धतीने हजारो रुपये खर्च केलेल्या जागेत कुंपणापेक्षा झुडपे व गवत जादा वाढल्यामुळे स्वच्छतेबाबत उदासीनता असल्याचे दिसत आहे. हे खुले प्लॉट परिसरातील रहिवाशांची डोकेदुखी ठरत आहेत. तसेच पालिकेच्या स्वच्छता मोहिमेलाही गालबोट लागत आहे. त्यामुळे अशा खुल्या प्लॉटच्या स्वच्छतेबाबत पालिकेकडून कार्यवाही होणे गरजेचे आहे.
भुरभुशीच्या घाटातील संरक्षक कठडे ढासळले
उंडाळे : येळगाव फाटा ते गुढे (ता. पाटण) या रस्त्यावर येळगावकडून भुरभुशीकडे जाण्यासाठी अवघड घाट रस्ता लागतो. या घाट रस्त्याचे संरक्षक कठडे नुकतेच बांधण्यात आले आहेत. मात्र, कठड्याच्या आत भराव न केल्याने वाहनांच्या धडकेत ते कोसळण्याची शक्यता आहे. परिणामी अशा घाटातील दर्जाहिन कठडे धोकादायक बनले असून, या कठड्यात तातडीने भराव करावा, अशी मागणी घाट रस्त्यातून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनधारक व ग्रामस्थांतून होत आहे.
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
मलकापूर : आगाशिवनगरात रस्त्यावरील पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांनी याबाबत पोलिसांसह पालिकेकडे अनेक लेखी तक्रारी केल्या. या सर्व तक्रारीचा विचार करून पालिकेने अतिक्रमण हटविण्याचा विषय गांभीर्याने घेतला होता. कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंत दोन्ही उपमार्गावर व कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यालगत अनेक विनापरवाना हातगाडे, वाहनातून रस्त्यांवरच व्यवसाय करीत आहेत. काही ठिकाणी फूटपाथवर दुकाने, तर रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी व अपघात घडले आहेत.