खंडाळा : ‘शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तिन्ही कायदे रद्द करावेत,’ या मागणीसाठी खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मागणीला पाठिंबा देण्याच्या उद्देशानेच पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने खंडाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात दीडशेच्या वर शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून हे कायदे रद्द करत नाही आणि दुसरीकडे या आंदोलनाला बदनाम करून शहीद आंदोलकांच्या बाबत जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याप्रकारे प्रतिक्रिया देतात त्या वाचाळवीरांचा बंदोबस्त करण्यातही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, याचाही विचार केंद्र सरकार करत नाही आणि शेतकरी आंदोलकांशी चर्चाही करत नाही, ही बाब गंभीर आहे. हा लोकशाहीचा घोर अपमान असल्याचे निदर्शनास येत आहे.
शेतकरी आंदोलनाच्या मागण्यांचा तातडीने विचार करून ते तीन कायदे रद्द करून दीर्घकाळ चालू असलेले अन्नदाता शेतकरीवर्गाचे आंदोलन थांबवावे आणि सर्वसामान्य शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष कांतीलाल खुंटे यांनी केली.