सातारा : शहरामध्ये केवळ तीन मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यांवरही आता वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. असे असताना अनेकजण आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी रस्त्यातच मंडप उभारत आहेत. त्यामुळे सर्वसामांन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्ता वेठीस धरला जात असताना पोलिसांचे मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरिकांमधून होत आहे.घरगुती कोणताही कार्यक्रम असो, सातात रस्ता खोदून मंडप टाकलाच म्हणून समजा. मंडपासाठी रस्ता खोदताना कोणीही परवानगी घेत नाही. घरगुती कार्यक्रम असल्यामुळे कोणी आडकाठी करत नाही. मात्र, संपूर्ण रस्ताच मंडपाने व्यापला जातो. त्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास होतोच; शिवाय पादचाऱ्यांनाही या ठिकाणाहून जाता येत नाही.
वाटेतच खुर्ची, टेबल ठेवले जातात. परिणामी वाहन चालकांना दुसऱ्या रस्त्याने जावे लागते. साताऱ्यातील गल्लीबोळात तर रोज एक तरी मंडप पाहायला मिळतो. सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा नागरिकांकडून आरोप होऊ लागला आहे.|गेल्या काही दिवसांपूर्वी राजवाडा परिसरामध्ये रस्त्यात मंडप उभारण्यावरून वादावादी झाली होती. एका युवकाचा साखरपुडा होता. त्या युवकाने रस्त्यातच मंडप उभारला होता. लोकांना तेथून जाताही येत नव्हते. एका युवकाने याचा जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला.
हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच एका नगरसेवकाने मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला. हा वाद प्रातिनिधीक स्वरुपाचा असला तरी या कारणावरून अशा प्रकारचे वाद नेहमीच होत असतात. परंतु कार्यक्रमात व्यत्यय नको,म्हणून याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. याचा अनेकजण गैरफायदा उठवत असतात. पालिका प्रशासनाने रस्त्यात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.