..................................................................
फसवणुकीच्या घटनांत वाढ
सातारा : सध्या बहुतांश व्यवहार ऑनलाईन होत असून, यातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रामध्ये संगणक क्रांती झाली आहे. गर्दी टाळून संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाकडूनही ऑनलाईन व्यवहारासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
................................................
विक्रेत्यांचे अतिक्रमण
सातारा : मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्याने विविध वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. मकरसंक्रांतीच्या सणामध्ये वाणवसा, वाण लुटण्याच्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीत लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे या सणामध्ये व्यवसाय करण्यासाठी हंगामी व्यावसायिक सज्ज झाले आहेत.
.........................................................
नागरिकांचा प्रतिसाद
सातारा : येथील भैरोबा डोंगरी ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सातारा-सज्जनगड पदभ्रमंती उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरवर्षी हा उपक्रम डोंगरी ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात येतो. या उपक्रमामुळे पदभ्रमंतीच्या निमित्ताने निसर्गात राहण्याची संधी मिळते.
,...................
बळीराजावर संकट
खटाव : खटाव तालुक्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवेळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील कधी ढगाळ वातावरण, कधी गारठा, तर कधी पाऊस शेतकरी अनुभवत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आल्याचे चित्र आहे.
..............
कांद्याचे तरवे तेजीत
सातारा : मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. परिणामी कांदारोपे अर्थात तरव्याची मागणी वाढल्यामुळे दर तेजीत आले आहेत. पूर्वी वाफ्यावर होणारी तरवा विक्री आता फुटावर केली जात आहे.
............................
वाहतुकीची कोंडी
सातारा : येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेतील रस्ता अरुंद असल्याने दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी चारनंतर या रस्त्यावरून चारचाकी वाहनांच्या रहदारीस बंदी घालण्यात आली आहे.
...............
वाहनचालक त्रस्त
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर आणि वाडी येथील टोल नाक्यावर फास्ट टॅग असून ही वाहतुकीची कोंडी रोजचीच बाब बनली आहे. व्यवस्थापन मात्र यावर निष्काळजी दिसत असून वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. तरी फास्ट टॅग यंत्रणा सुरळीत सुरू करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.
.........................
मोबाईल चोरटे सक्रिय
वाई : वाई शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. त्यांचा शहरात सुळसुळाट झाला असून सध्या भाजी मंडई चोरट्यांच्या रडारवर आहे. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकरांना मंडईतून जाताना मोबाईलविना परतावे लागत आहे.
........