कऱ्हाड : शहरातील सिग्नल यंत्रणा अनेकदा बंद अवस्थेत असल्याने वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे शहरातील सिग्नल यंत्रणा नियमित सुरू राहावी, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे. शहरात एकूण सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. कोल्हापूर नाका, कर्मवीर चौक, विजय दिवस चौक, उपजिल्हा रुग्णालय चौक, कृष्णा नाका या ठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे. मात्र अनेकदा ही यंत्रणा बंद असते. भेदा चौकातील यंत्रणा गत कित्येक दिवसांपासून बंदच आहे. तर विजय दिवस चौक येथील यंत्रणा अनेकदा बंद पडते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. या यंत्रणेकडे पालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सिग्नल यंत्रणेच्या आसपास असणारी झाडी व फांद्या काढून टाकाव्यात, अशीही मागणी केली जात आहे.
कऱ्हाडात प्लास्टिक पिशव्या विक्रीवर ‘वॉच’
कऱ्हाड : शहरात काही दिवसांपूवी प्लास्टिक पिशव्यांची खरेदी करताना पालिका आरोग्य विभागाच्या पथकाने एका व्यापा-याला पकडले होते. त्यांच्याकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करीत त्यास ५ हजार रुपयांचाही दंड केला होता. शहरात प्लास्टिक पिशव्या बंदीची घोषणा करूनदेखील विक्री व वापर होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अधिक तीव्रपणे कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रभागनिहायक पथकांची स्थापना केली असून त्या पथकातील अधिका-यांमार्फत भाजी मंडई, बसस्थानक तसेच मुख्य बाजारपेठ परिसरात वॉच ठेवला जात आहे.
किरपे ते येणके मार्गावर विहीर धोकादायक
तांबवे : किरपे ते येणके रस्त्यावर व येणके हद्दीत असलेली विहीर धोकादायक ठरत आहे. रस्त्याच्या कडेला काढण्यात आलेल्या या विहिरीला संरक्षक कठडेही बांधण्यात आलेले नाहीत. याशिवाय कोणत्याही सूचनांचे फलक लावले गेले नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. परिणामी रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाताना दुचाकी वाहनचालकांची फसगतही होत आहे. या विहिरीबाबत संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवाशांतून केली जात आहे.
तांबवे फाट्यापासून रस्त्याची अवस्था दयनीय
तांबवे : तांबवे फाटा ते तांबवेपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्ता धोकादायक बनला आहे. तांबवे येथे नवीन पूल सुरू करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्त्यातील खड्ड्यावर संबंधित ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी केली आहे. सध्या खडी उखडून पूर्वीपेक्षा मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
बसस्थानकात स्वच्छतागृह बंद असल्यामुळे गैरसोय
उंब्रज : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृह गत सहा महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांसह परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटी वाहतूक बंद होती. त्यामुळे बसस्थानकावरील स्वच्छतागृह कुलूपबंद होते. आता एसटी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची बसस्थानकात ये-जा सुरू झाली आहे. कुलूपबंद असलेले स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.