वडूज : गुरसाळे (ता. खटाव) येथील जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नूतन इमारतीत कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली याविषयी निवेदन देण्यात आले.
याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, सध्या सर्वत्र कोरोना संसर्गजन्य आजाराचा कहर वाढत चालला आहे. गुरसाळे परिसरातील अनेक गावांमध्ये दिवसेंदिवस बाधित रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत कोविड सेंटर सुरू होणे गरजेचे आहे. गावात आरोग्य विभागाची नवी इमारत बांधून तयार आहे. या इमारतीत योग्य ती यंत्रणा वापरून कोविड सेंटर सुरू केल्यास गाव परिसरातील रुग्णांना दिलासा मिळेल.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तहसीलदार किरण जमदाडे, युवा नेते रणजितसिंह देशमुख आदींना हे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर माजी पंचायत समिती सदस्य भरत जाधव, डॉ. बाळासाहेब झेंडे, भागवत जाधव, गोविंद काळे, सुरेश लंगडे, आदींच्या सह्या आहेत.