लोणंद : लोणंद शहर सहा दिवसांपासून अंधारात असून, शहरातील नगर पंचायतीच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे लोणंद शहर अंधारमय झाले आहे. पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे चिटणीस व माजी विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे यांनी केली आहे.
वीज कंपनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत काळातील वीजबिलाची ८५ लाख रुपये रक्कम थकल्याने सहा दिवसांपासून लोणंद शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा महावितरणने बंद केला आहे. त्यामुळे सहा दिवसांपासून शहर अंधारमय झाले आहे. यामुळे शहरात चोरीच्या घटना व अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी त्वरित वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेसचे चिटणीस व माजी विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे यांनी नगर पंचायतीकडे केली आहे.
यावेळी माजी नगरसेविका शैलजा खरात, साफराज बागवान, रमेश कर्णवर, दादासाहेब शेळके, दत्ता खरात, उमेश खरात, शरद भंडलकर, तारीक बागवान, बालकिसन भाटीया, इकबाल बागवान, शकील इनामदार उपस्थित होते.