कोपर्डे हवेली : जिल्ह्यातील अनेक गावांमधील पथदिवे बंद असल्याने ग्रामीण भाग अंधारात आहे. त्यासाठी गावोगावचे पथदिवे सुरु करण्यात यावेत, असे निवेदन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांना जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते भीमराव पाटील यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, कोरेगाव पंचायत समितीचे सदस्य विकास राऊत, बनवडीचे ग्रामपंचायत सदस्य मोहनराव जानराव उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांची जोडणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने खंडित केली आहे. त्यामुळे अनेक गावांमधील पथदिवे बंद आहेत. पावसाळी दिवसात यामुळे अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या अंधाराचा मोठा फटका आधीच कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना बसत आहे. ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील पथदिव्यांचा वीज पुरवठा पूर्वीसारखा सुरू करण्याबाबत उच्चस्तरावरुन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला सूचित करावे व ग्रामीण भागातील अंधकार दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.