कोरेगाव : कोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ पालखी मार्गावर रहिमतपूर ते गोळेवाडी दरम्यान सुरू असलेले विनापरवाना बांधकाम त्वरित थांबवावे; अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शहाजी बर्गे यांनी दिला आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची दरवर्षी अक्षय तृतीयेला यात्रा भरते. यात्रेत तीन ते चार दिवस छबिना, तमाशा, बैलगाडी शर्यत असे अनेक कार्यक्रम होतात. अलीकडे शासनाच्या आदेशानुसार बैलगाडी शर्यत आयोजित केली जात नाही. श्री भैरवनाथाची पालखी निघते. काही वर्षांपर्यंत भैरवनाथाची पालखी मंदिरापासून गावंदर शिवारातून पुढे बांधकाम विभागाच्या निवासस्थानापासून रहिमतपूर रस्ता ओलांडून पुढे मधून गोळेवाडी रस्त्यापर्यंत जात असे. त्यासाठी गावकऱ्यांनी पालखी मार्ग तयार केला आहे. तो मार्ग ९ मीटर आहे. तो मार्ग शहर विकास आराखड्याच्या नकाशावर आहे. या रस्त्यावर अनेकांनी आपल्या जागा बिनशेती केल्या आहेत. या मार्गावर असणाऱ्या शेत जमिनीधारकांना तेवढा एकमेव मार्ग भविष्यात जाण्यायेण्यासाठी आहे. दुसरा कोणताही मार्ग या लोकांना नाही. या पालखी मार्गावर लोकप्रतिनिधींनी पैसे टाकून हा मार्ग तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि जमीनधारकांमधून अनेक वर्षे सुरू आहे. या मार्गावर रहिमतपूर ते गोळेवाडी दरम्यान बेकायदेशीर आरसीसी बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामामुळे तो पालखी मार्ग बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. सदरचा मार्ग तीस फुटांचा आहे. तो ज्या ठिकाणाहून जातो त्याच्या मध्ये हे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. या पालखी मार्गावरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावे.