वेळे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर गावापासून वाईकडे जाताना केंजळ हे पहिले गाव लागते. या गावाजवळ असलेले उलट्या ‘एस’ आकारातील वळण धोकादायक ठरत आहे. याठिकाणी अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. ती रोखण्याबाबत ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. यामध्ये वाहनांसाठी वेगमर्यादा ठरवून देण्याची मागणी करण्यात आली.
या गावातील लोकांना इतर ठिकाणी व वाई तालुक्यात कामानिमित जाण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक व अन्य कामासाठी वाई, सातारा व पुणे येथे जाण्यासाठी राज्यमार्ग ११९ वर केंजळ येथील थांब्यावर यावे लागते. तेथूनच पुढे या गावच्या लोकांना जावे लागते. केंजळ फाट्यापासून वाईकडे जात असताना केंजळ गावानजीक उलट्या ‘एस’ आकाराचे वळण आहे. हे वळण खंडाळा घाटातील ‘एस’ कॉर्नरसारखेच घातक ठरत आहे. या वळणावरून येणारी वाहने रस्ता ओलांडत असलेल्या पादचाऱ्यांना दिसत नाहीत. यामुळे अपघात होऊन केंजळ ग्रामस्थांना नाहक अपंगत्व व प्रसंगी स्वतःचा जीवही गमवावा लागत आहे.
या परिस्थितीमुळे या ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. केंजळ येथील भरधाव वेगातील वाहतुकीवर काहीतरी पर्याय काढून केंजळ ग्रामस्थांची होत असलेली हानी टाळण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केंजळ फाटा येथे वाई सुरूर रस्त्यावर येताना-जाताना असंख्य विद्यार्थी, ग्रामस्थ व महिलांना रस्ता ओलांडत असताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यमार्ग ११९ हा पाचगणी-महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना, तसेच मांढरदेव देवस्थानला जाणारा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावरून पुणे-मुंबई येथून येजा करणारे कारचालक भरधाव वेगाने आपली वाहने चालवितात. पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. वाहणे भरधाव असल्याने कित्येक वेळा प्रवाशांना रस्ता ओलांडताना थांबावे लागते, तर कित्येक जण रस्ता ओलांडताना येत असलेल्या वाहनांच्या वेगाचा अंदाज न आल्याने जखमी झाले आहेत. केंजळ फाटा येथे योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात असे निवेदन वाई पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, केंजळचे सरपंच मिलन गायकवाड, उपसरपंच अमोल कदम, ग्रामपंचायत सदस्य नीलेश जगताप व सामाजिक कार्यकर्ते जयंत येवले यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिले आहे.