सातारा : महावितरण कंपनीतर्फे सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेतात व कुठलेही उत्तर न देता हुकूमशाही पद्धतीने अन्यायकारक वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडली जात आहेत. ही कारवाई तत्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
स्वाभिमानीतर्फे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनातील जबाबदार मंत्र्यांनी प्रसार माध्यमातून वेळोवेळी वीजबिल माफ करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे एवढ्या थकबाकीचा डोंगर झालेला आहे. असे असताना अचानक लॉकडाऊन उठल्यानंतर जनतेकडे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना अचानकपणे जबरदस्तीने विद्युत कनेक्शन कट करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. वेळप्रसंगी बेकायदा वसुली सुरू ठेवण्यात आली आहे. ही कारवाई तातडीने थांबवावी. अन्यथा दिनांक २४ फेब्रुवारी रोजी नागठाणे येथे सर्व बाधित ग्राहकांना घेऊन महावितरण व शासनाविरोधात हनुमान मंदिर येथून आक्रोश मोर्चा काढण्यात येईल व नागठाणे सासपडेरोड कमानीजवळ प्रश्न निकाली लागेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, याची संपूर्ण जबाबदारी महावितरणची राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ, विजय चव्हाण, महादेव डोंगरे, जनार्दन आवारी, हेमंत खरात, दत्तात्रय पाटील यांनी दिला आहे.