ढेबेवाडी : ‘भ्रष्टाचारातून अर्थसंपन्न झालेल्या मोदी सरकारने आता भ्रष्टाचारी पैशाने बहुजनांचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. मोदी पुन्हा सत्तेवर आले तर लोकशाही नष्ट होईल. निवडणुकाही होणार नाहीत आणि ठोकशाही उदयास येईल,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
ढेबेवाडी, ता. पाटण येथे पाटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचा मेळावा तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा सत्कार अशा संयुक्तिक कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आमदार जयकुमार गोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, मंदाकिनी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती कमी करून शेतीव्यवस्था खिळखिळी करत संपूर्ण साखर कारखानदारीसह सहकार उद्ध्वस्त करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. मोदी सरकारने आणि स्वत: मोदींनी राफेल खरेदीमध्ये तीस हजार कोटींचा मोठा भ्रष्टाचार केला आहे.पाच वर्षांत कोणतेही आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही. याउलट २०१८ मध्ये १ कोटी १० लाख नोकºया या सरकारने कमी करून बेरोजगारी निर्माण केली. तर सर्वात जास्त शेतकºयांनी यांच्याच काळात आत्महत्या केल्याची नोंदही झाली आहे. यामुळे या जातीयवादी सरकारला हद्दपार करण्यासाठी तेवीस समविचारी पक्षांनी आता लढा पुकारला आहे.’
यावेळी आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, हिंदुराव पाटील आदींची भाषणे झाली. संजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग यादव यांनी आभार मानले.