सातारा : महाबळेश्वर हा एक निसर्गसंपन्न भाग आहे. याठिकाणी झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे काम भूमिपुत्र म्हणून आम्ही करत आहोत; पण जर कोणी चुकीच्या पद्धतीने याठिकाणी बेकायदेशीर काम करून निसर्गाची हानी करत असेल तर ते चुकीचेच आहे. असे बेकायदेशीर बांधकाम मग तो विशाल अग्रवाल असो अगर कोणीही, त्याचे बांधकाम बुलडोझर लावून तत्काळ तोडून टाका, अशा सूचना मी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.पुणे येथे झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या महाबळेश्वर कनेक्शनची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. या अपघातातील अल्पवयीन युवकाचे वडील असलेले विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे एक आलिशान हॉटेल असून या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकाम करण्यात आले आहे. या हॉटेल मध्ये बार आणि स्पादेखील चालविला जातो. विशेष म्हणजे पारशी ट्रस्टला दिलेली ही सरकारी जागा अग्रवालने आपली फॅमिली प्रॉपर्टी केली आहे.महाबळेश्वर येथे सिटी सर्व्हे क्रमांक २३३ ही शासकीय मिळकत आहे. रहिवास या कारणासाठी ही मिळकत पारशी जिमखाना या ट्रस्टला तीस वर्षांच्या कराराने सरकारकडून देण्यात आली. वेळोवेळी या मिळकतीच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यात आले. २०१६ साली पारशी जिमखाना या ट्रस्टवर पारशी नसलेले सुरेंद्रकुमार अग्रवाल व उषा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना घेण्यात आले. त्यानंतर केवळ चार वर्षांनी म्हणजे २०२० साली पारशी जिमखाना ट्रस्टवर असलेल्या सर्व ट्रस्टींची नावे कमी होऊन त्या ठिकाणी अग्रवाल यांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे ट्रस्टी म्हणून दाखल झाली.पारशी जिमखाना ट्रस्टला जी शासकीय मिळकत दिली ती केवळ रहिवासासाठी देण्यात आली होती. नंतर त्या मिळकतीपैकी काही भाग हा वाणिज्य करून घेऊन त्या सर्वच मिळकतीचा वापर हा वाणिज्यसाठी सुरू झाला आहे. आता पारशी जिमखाना ऐवजी या ठिकाणी एमपीजी क्लब हे तारांकित हाॅटेल सुरू करण्यात आले आहे. या हाॅटेलसाठी या मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकामदेखील करण्यात आले आहे. याच मिळकतीमध्ये बार आणि स्पादेखील सुरू आहे. या ठिकाणी अनेक नियम धाब्यावर बसवून हॉटेल चालविले जात असल्याने या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी एप्रिलमध्ये तक्रार केली होती. या शिवाय या हॉटेल संदर्भात अनेक तक्रारी आल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे.या हॉटेलबाबत अनेक तक्रारी येऊनही पालिकेने या हॉटेलवर अद्याप कोणतीच कारवाई न केल्याने विशाल अग्रवाल यांना पाठीशी घालणारे पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशाल अग्रवालचे महाबळेश्वरमधील बेकायदेशीर बांधकाम तोडून टाका, मुख्यमंत्र्यांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:03 PM