सातारा : सातारा शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील ८ ते १० टपऱ्यांची तोडफोड झाली. मद्यप्राशन करून १० ते १५ जणांनी ही तोडफोड केली असून, यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या दक्षिणेकडील रस्त्याच्या बाजूला अनेक टपऱ्या आहेत. पान टपरी, रसवंती गृह, चायनीज तसेच चहाच्याही टपऱ्या आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास काहीजणांनी मद्याच्या नशेत गोंधळ घालत टपऱ्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
या तोडफोडीत अज्ञातांनी ८ ते १० टपऱ्या उलथवून टाकल्या. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. एका दुकानातून तर ७ हजारांचा माल आणि २४०० रुपयांची रोकडही चोरीस गेल्याचे सांगण्यात आले, तर काही टपऱ्यांचे पत्रे उचकटण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा हजारो रुपयांत आहे, तर संबंधितांनी कपडे काढून टपऱ्यांची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी टपरीधारक आले असता त्यांना नुकसानीची कल्पना आली. त्यांनी पोलिसांनाही याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.
चौकट :
उधारीसाठी हुज्जत अन् धमकी...
घटनास्थळावरील काही टपरीचालकांनी सांगितले की, आमच्याकडे काहीजण सतत पैसे मागत असतात. त्यातच उधार काही दिले नाही, तर हुज्जत घालतात. धमकीही देण्यात येते. आता तर टपऱ्यांची तोडफोड केली. हे नुकसान कसे भरून काढणार. आम्हाला नेहमीच काहीजणांचा त्रास होतो. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. तसेच यापुढे असे प्रकार होऊ नयेत, यासाठी संबंधितांवर जरब बसवावी, तर एका टपरीचालकाने संबंधितांना राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे आम्ही कसा धंदा करायचा, असा प्रश्न पडला आहे.
फोटो दि. ०८सातारा टपरी फोटो...
फोटो ओळ : सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाजवळील काही टपऱ्यांची अज्ञाताने तोडफोड केली. यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे.
.................................