सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या प्रस्थापित पक्षांनी धनगर समाजाच्या एकालाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे या प्रस्थापितांच्या विरोधात माढ्यासह राज्यातील १० मतदार संघांत समाजातील उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती रासपचे सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सचिन पडळकर यांनी दिली.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जगन्नाथ जानकर, प्रा. सचिन होनमाने, उद्योजक विनायक मासाळ आदी उपस्थित होते.पडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटलाच नाही. तर निवडणुकीच्या तोंडावार सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन धनगर समाजाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलाय; पण या निवडणुकीत आम्ही धनगर आरक्षणाचा मुद्दा घेऊनच लढणार आहे. त्यासाठी माढ्यातून अपक्ष म्हणून मी निवडणूक लढवत आहे.
जानकर म्हणाले, राज्यातील दहाहून अधिक लोकसभा मतदार संघांत धनगर समाजाचे मतदान निर्णायक आहे. तरीही या समाजाला राजकीय प्रवाहापासून दूर ठेवले जाते. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत १० मतदार संघांत समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यातील माढा मतदार संघातील उमेदवार ठरला आहे.राज्यातील मातब्बरांची आमदारकी, खासदारकी धोक्यात येणार असल्यानेच धनगर समाजाला आरक्षणापासून दूर ठेवले जात आहे, असा आरोप करून जानकर पुढे म्हणाले, राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आमचे खच्चीकरण केले. त्यासाठीच आता आम्हाला सत्तेत यायचे आहे.