कोपर्डे हवेली : कोविड १९ कालावधीत राज्यातील महावितरण, महापारेषण, महाजनरेशन कंपनीतील वीज कामगार, अधिकारी, अभियंता आणि आउट सोर्सिंग कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाचे रान करून राज्यातील जनतेला प्रकाशात ठेवण्याचे काम केले. हे काम करताना तीनही ऊर्जा क्षेत्रातील कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यासाठी तिन्ही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा मिळावा म्हणून सातारा येथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांनी महावितरण सातारा मंडल कार्यालयाच्या गेटवर काळ्या फिती लावून सोशल डिस्टन्सचा वापर करून निदर्शने केली आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा धिक्कार केला.
या वेळी महाराष्ट्र राज्याचे संघटनेचे संयुक्त सचिव काॅम्रेड नानासाहेब सोनवलकर आणि त्यांचे सहकारी निदर्शनात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे अध्यक्ष काॅ. मोहनजी शर्मा, कार्याध्यक्ष काॅ. सी. एन. देशमुख, सरचिटणीस काॅ. कृष्णाजी भोयर, काॅ. महेश जोतराव व केंद्रीय ऊर्जा खाते कार्यकारिणी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फ्रंटलाइन वर्करचा दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू आहे. पण, अद्याप निर्णय झाला नसल्याने संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
फोटो ओळ....
महावितरण सातारा मंडल कार्यालयाच्या गेटवर काळ्या फिती लावून निदर्शने करताना काॅ. नानासाहेब सोनवलकर आणि संघटनेचे कार्यकर्ते.