वडूज : राज्यातील कोरोना रोखण्यासाठी घरोघरी जाऊन कार्यरत असलेल्या कोरोना योद्धा आशा स्वयंसेविकांना प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करावे लागले. राज्य आशा-गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्यावतीने लेखी निवेदन दिल्यानंतर वडूज पंचायत समितीच्या आवारात घोषणाबाजी करून प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न केले.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कोविड योद्धा बनून आशा स्वयंसेविका यांनी सार्वत्रिक लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण, तपासणी, नोंदणी त्याचबरोबर या प्रशासकीय इतर प्रकारची कामे पूर्ण केली आहेत. प्राथमिक आरोग्य सेवा, विलगीकरण कक्षामध्ये आठ तासांपेक्षा जास्त कामे करावी लागली आहेत. त्यांचा शासकीय सेवेत समावेश करावा, भत्ता व वेतन वाढवून मिळावे, कोरोना बाधित झाल्यास उपचार केंद्रात राखीव बेड उपलब्ध करावा, मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांचा विमा निधी द्यावा, रिक्त पदे भरावीत, आरोग्य साहित्यांसहित इतर सोयी-सुविधा अशा प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी वडूज पंचायत समितीच्या आवारात मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी काही काळ घोषणाबाजी केली.
दरम्यान, तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका यांनी गटविकास अधिकारी रमेश काळे, डॉ. युन्नूस शेख यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले. आपल्या मागण्यासंदर्भात वरिष्ठांमार्फत शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून, लवकरच यावर तोडगा निघेल, असा विश्वास गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी यावेळी दिला.
१८वडूज
वडूज पंचायत समितीच्या आवारात आशा स्वयंसेविकांनी शुक्रवारी काही काळ निदर्शने केली. (छाया : शेखर जाधव)