सातारा : ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून, मंगळवारी दुपारी साताऱ्यातील मंगळवार पेठेमध्ये राहणाऱ्या एका मजुराचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.रुपेश महादेव सावंत (वय ४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे डेंग्यूने मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. सावंत हे मार्केट यार्डमध्ये मजुरी करत होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते तापाने आजारी होते. त्यामुळे त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
सोमवारी सायंकाळी थोडे बरे वाटल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. परंतु मंगळवारी दुपारी अचानक त्यांना पुन्हा ताप आला. एवढेच नव्हे तर त्यांना धाप लागून श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. घरात्यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयातील तीन सफाई कर्मचारी आजारी पडले असून, त्यांनाही डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. तसेच सदर बझारमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी दुपारी जाऊन पाहणी केली. त्यावेळी एका घरामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात अळ्या सापडल्या. संबंधितांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन यावेळी कर्मचाऱ्यांनी केले.