शेखर उर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (रा.हजारमाची-ओगलेवाडी, ता.कऱ्हाड), अमित हणमंत कदम (रा.होली फॅमिली स्कूलमागे, वैभव कॉलनी, विद्यानगर-सैदापूर), तुकाराम उर्फ बाबा पंडित जगताप (रा.कोडोली, ता.कऱ्हाड) व अनिकेत रमेश बाबर (रा.उंब्रज, ता.कऱ्हाड) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपअधीक्षक डॉ.रणजीत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांमार्फत कसोशीने प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रेकॉर्डवरील आरोपींवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते, तसेच त्यांना त्यांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी संधीही दिली जाते. मात्र, काही जण संधी देऊनही वारंवार गुन्हे करतात. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याबाबतचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात.
कऱ्हाड शहर, ग्रामीण व उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौघांविरुद्धचे असे प्रस्ताव २०१९-२०२० मध्ये दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते. तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांनी त्याबाबत परिपूर्ण चौकशी करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अहवालही सादर केला होता. त्यानुसार, संबंधित चौघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
दरम्यान, उपविभागात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेऊन यापुढेही गुन्हेगारी कारवाया करून सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपअधीक्षक डॉ.रणजीत पाटील यांनी दिला आहे.