सातारा : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन शेतकरी आंदोलनाचे मनोबल वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर वंचितच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात वेळोवेळी लोकशाही मार्गाने आंदोलन करून आवाज उठविला जाईल, अशी माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.
दिल्ली येथे गेली १०० दिवस अन्नदाता शेतकरी आंदोलन करत आहे आणि याच आंदोलनात जवळ जवळ १५० च्या वर आंदोलक शहीद झाले असताना सरकार जबाबदारीने आंदोलकांशी चर्चा करून हे कायदे रद्द करण्याबाबत काहीच करत नसून फक्त आंदोलकांची दिशाभूल आणि अवहेलनाच करत असल्याचा आरोप वंचिततर्फे करण्यात आला. मूठभरच शेतकरी आंदोलन करीत असल्याबाबत बदनामी करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याने ही लोकशाही प्रक्रियेती क्रूर चेष्टाच चालवलेली असल्याने शेतकरी संघटनांचे मानसिक मनोबल वाढवण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून पुन्हा सामाजिक भाईचारा निर्माण करण्यासाठी मुस्लीम बांधवांच्या वतीनेही धरणे आंदोलन करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जोपर्यंत शेतकरी आंदोलन संपत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या लोकशाही पद्धतीची तीव्र आंदोलने करत राहणार असून, आम्ही शेतकऱ्यांच्याबरोबर आसल्याचेही आंदोलनावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी सातारा तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे, सुनील खरात, सुभाषराव गायकवाड, बाळकृष्ण देसाई, दादासाहेब केंगार, सुधाकर काकडे, डी. बी. जाधव, गणेश कारंडे, कल्पना कांबळे, वसंत खरात, शशिकांत खरात, गणेश भिसे, सत्यवान कांबळे, संदीप कांबळे, राजेंद्र सकट आदी सर्व जिल्हा तालुका शहर महिला पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)
फोटो नेम : ०५जावेद०२